Thursday, January 2, 2020

तिळ

दन्त्यो वर्णः कफकरो व्रणं वातं च नाशयेत्‌ ।। ..निघण्टु रत्नाकर
तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.
तीळ सडपातळ व्यक्तीला स्थूल आणि स्थूल व्यक्तीला सडपातळ बनवतात.  असे हे दिव्य औषध आपण काळाच्या घोडदौडीत विसरून जात आहोत.

काळे आणि पांढरे असे तीळ आजकाल बाजारात मिळतात त्यातले काळे तीळ औषधासाठी श्रेष्ठ आहेत. धार्मिक कार्यांत सुद्धा तिळाला खूप महत्व आहे.

तिळाचे असंख्य प्रयोग असून काही महत्वाचे औषधीय प्रयोग आज आपण पाहू.
१) बद्धकोष्ठ, मूळव्याध आदी विकार तिळाच्या सेवनाने कमी होतात. मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.

२) जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.

३) दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून ते दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. काळे तीळ नियमित चावून खाणार्या लोकांना दातांचे विकार शक्यतो होत नाहीत.

४) तिळाच्या झाडाची पाने आणि मुळे यांचा काढा करून त्याने केस धुतल्यास काळेभोर आणि मुलायम होतात.

५) जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.

६) लघवीतून पु जात असेल तर तिळाचे सेवन उपयुक्त आहे. तीळ शरीरातील सर्व धातूंना बलदायी असल्याने अशा त्रासदायक विकारात तीळ अमृतासारखा आहे.

७) स्त्रियांना पाळीच्या वेळी वेदना होत असतील तर औषधांमध्ये तीळ वापरतात याने वेदना कमी होऊन पाळी सुकर होऊन जाते.

८) सूज, किडनी विकार, वात, पोटातील अल्सर यावर तिळाचं तेल अतिशय उपयुक्त ठरतं.

९) तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं अधिक प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

१०) तीळ स्निग्ध असल्यामुळे कोरडी त्वचा असणा-यांनी याचं तेल अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा मऊ होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत किंवा वर्षभरात तिळाचा आहारात समावेश करावा.

११) केस वाढण्यासाठी केसांच्या मुळाशी तिळाचे तेल लावल्याने उत्तम ठरतं. इतकंच नव्हे केसांत झालेल्या उवा मारण्यासाठी वनस्पतीचा श्लेष्मल रस उपयुक्त ठरतो.

१२) सांधेदुखीवर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने लवकर आराम पडतो.

१३) पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाने मसाज करावा. चरबी काही प्रमाणात कमी होते.

१४) भाजलेल्या किंवा पोळलेल्या जागेवर तीळ वाटून त्याचा लेप लावल्याने आराम पडतो.

१५) मूत्रल म्हणून तिळाचे बी अतिशय उपयुक्त ठरते.

१६) डोळे किंवा कातडी यांच्या विकारावर बी आणि पानं वाटून त्यांचा लेप लावल्यानेही कित्येक विकार बरे होतात.

१७) मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो.

१८) तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या मूळव्याधीमध्ये रक्‍त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो.

१९) वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.

२०) शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो.

२१) लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

२२) शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले व कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते.

२३) डोक्‍यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.

२४) शौचाला खडा होणे, त्यामुळे गुदमार्गात वेदना होणे, क्वचित त्या ठिकाणी चिरा पडल्यामुळे रक्‍तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी व तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्‍यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात.                                       डॉ. श्री .नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.

No comments: